पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळूरू येथे भारत उर्जा सप्ताह (आयईडब्ल्यू)2023 चे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी भारतीय तेल महामंडळाच्या ‘अनबॉटल्ड’उपक्रमाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या गणवेशांचे अनावरण केले. हे गणवेश पुनर्प्रक्रिया केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून तयार करण्यात आले आहेत. भारतीय तेल महामंडळाद्वारे निर्मित अंतर्गत सौर कुकिंग प्रणालीच्या ट्वीन कुकटॉप मॉडेलचे देखील पंतप्रधानांनी लोकार्पण केले आणि या मॉडेलच्या व्यावसायिक पातळीवरील विक्रीचा प्रारंभ केला.
कार्यक्रमाच्या नंतरच्या भागात, पंतप्रधानांनी इथेनॉल मिश्रित इंधन वापरासाठी निश्चित केलेल्या आराखड्यानुसार, 11 राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांतील तेल विपणन कंपन्यांच्या 84 किरकोळ दुकानांमध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने ई-20 इंधनाच्या वापराची सुरुवात केली. तसेच त्यांनी यावेळी हिरवा झेंडा दाखवून हरित प्रवास रॅलीचा प्रारंभ केला. या रॅलीमध्ये हरित उर्जा स्त्रोतांवर चालणारी वाहने सहभागी होणार असून या उपक्रमाद्वारे हरित इंधनांच्या वापराविषयी जनतेत जागरूकता निर्माण करण्यास मदत होईल.
पार्श्वभूमी
कर्नाटकातील बंगळुरू येथे 6 - 8 फेब्रुवारी दरम्यान इंडिया एनर्जी वीक अर्थात भारत उर्जा सप्ताह 2023 आयोजित करण्यात आला असून ऊर्जा स्थित्यंतर म्हणजेच बदलाचं जागतिक शक्तीपीठ म्हणून भारताच्या वाढत्या नैपुण्याचं प्रदर्शन करणं हे या सप्ताहाचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमामुळे पारंपरीक आणि अपारंपरीक ऊर्जा उद्योग, सरकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींना एकत्र येऊन जबाबदार ऊर्जा स्थित्यंतरामुळे निर्माण होणारी आव्हाने आणि संधी यावर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. यात जगभरातून 30 हून अधिक मंत्री उपस्थित राहणार आहेत. तर 30,000 हून अधिक प्रतिनिधी, 1,000 प्रदर्शक आणि 500 वक्ते भारताच्या ऊर्जा भविष्यातील आव्हाने आणि संधींवर चर्चा करण्यासाठी एकत्र येतील.
पंतप्रधानांच्या हस्ते इंडियन ऑइलच्या ‘अनबॉटल’ उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या गणवेशाचं लोकार्पण यावेळी झालं. एकदा वापरता येणाऱ्या प्लास्टिकचा वापर कायमस्वरुपी बंद करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पानुसार, पेट्रोलपंपावर इंधन विक्री करणारे कर्मचारी आणि एलपीजी सिलिंडर घरपोच.
देणाऱ्या कर्मचार्यांसाठी पुनर्वापर केलेल्या पॉलिस्टर (rPET) आणि सुती कापडापासून बनवलेले गणवेश पुरवण्याचा निर्णय इंडियन ऑइलनं घेतला आहे. इंडियन ऑइलच्या ग्राहक अटेंडंटच्या गणवेशाचा प्रत्येक संच, वापरलेल्या सुमारे 28 बाटल्यांच्या पुनर्वापराने तयार केला जाईल. इंडियन ऑइलचा ‘अनबॉटल्ड’ हा उपक्रम अर्थात पुनर्नवीनीकरण केलेल्या पॉलिस्टरपासून बनवलेल्या व्यापारासाठी लाँच केलेला टिकाऊ कपड्यांचा ब्रँड या माध्यमातून सर्वांसमोर येत आहे. इंडियनऑईलने या ब्रँड अंतर्गत, तयार केलेले गणवेश/पोशाख, इतर तेल विपणन कंपन्यांच्या ग्राहक अटेंडंट्ससाठी, लष्करासाठी नॉन-कॉम्बॅट अर्थात युद्ध प्रसंग नसताना घालण्यासाठी, संस्थांसाठी आणि किरकोळ ग्राहकांना विक्री करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
इंडियन ऑइलने विकसीत केलेल्या, बंदीस्त ठिकाणी सौरऊर्जेवर चालणाऱ्या स्वयंपाक सुविधेच्या ट्विन-कूकटॉप मॉडेल म्हणजेच दुहेरी शेगडीचं लोकार्पण आणि तिच्या व्यावसायिक उपयोगाचं उद्घाटन देखील, पंतप्रधानांच्या हस्ते झालं. इंडियन ऑइलनं यापूर्वी एक नाविन्यपूर्ण अशी एकेरी शेगडी असलेली इनडोअर सोलर कुकिंग सिस्टीम विकसित करुन तिचा स्वामित्व हक्क (पेटंट) मिळवला होता. या एकेरी शेगडीला मिळालेल्या प्रतिसादाच्या आधारे, या ट्विन-कूकटॉप इनडोअर सोलर कुकिंग सिस्टीमची रचना, वापरकर्त्यांना अधिक लवचिकता आणि सुलभता प्रदान करणारी आहे. हे एक सौरऊर्जेवर चालणारे क्रांतिकारी इनडोअर सोलर कुकिंग सोल्यूशन आहे जे एकाच वेळी सौर आणि सहाय्यक ऊर्जा स्त्रोतांवर कार्य करते, या गुणवैशिष्ट्यांमुळे ते भारतासाठी स्वयंपाकाचे एक विश्वासार्ह साधन ठरेल.